पुण्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता फरार
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली. घरगुती हिंसाचारातूनच तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सुरुवातीला वैष्णवीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे तसेच वैष्णवीची सासू आणि नणंद यांना अटक केली. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा फरार झाला आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
वैष्णवीने प्रेमविवाह केला होता. या लग्नात तिच्या माहेरच्यांनी ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, अॅक्टिवा दुचाकी तसेच इतरही महागड्या वस्तू दिल्या होत्या. मात्र घरच्यांचा सततचा जाच आणि चारित्र्यावरून घेतल्या जात असणा-या संशयामुळे तिने जीवन संपविले असल्याचे सांगितले जात असतानाच तिची हत्या करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात आता शरद पवार गटाने लक्ष घातले असून, खा. सुप्रिया सुळे यांनी वैष्णवीला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता, असा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची दाखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.