लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात गेल्या दिड महिण्यापासून आवकाळी पावसाच्या बरोबरच विजांचा कडकडाट होत विजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हयात दि. ३ एप्रिल ते आज पर्यत ७४ पशुधनावर आकाशातून पडणा-या विजांचे बळी ठरले आहे. त्यामुळे शेतक-यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पावसाळा पूर्व व पावसाळा संपेपर्यंत शेतक-यांना आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी लागणार आहे.
जिल्हयात गेल्या कांही दिवसापासून सतत वातावरणात बदल घडत आहेत. तसेच मोसमी पावसाच्यापूर्वीच अवेळी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हयात गेल्या दिड महिण्यापासून विजांच्या कडकडाटासह वादळ, वारा, पाऊस पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. विजांच्यामुळे पशुधनाचा बळी जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांचे पशुधन नैसर्गीक आपत्तीला बळी ठरत आहे. दि. ३ एप्रिल ते २० मे पर्यंत म्हणजेच गेल्या दिड महिण्यात आकाशातून ७४ पशुधनावर विज पडून पशुधनाचा मृत्यू झाला आहे.