मुंबई : राज्य पोलिस दलातील २२ पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान लातूरचे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची छत्रपती संभाजीनगरच्या उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली असून मुंडे यांच्या जागी आयपीएस जयंत मीना यांची लातूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिका-यांची वर्णी लागली असून दोन लेडी सिंघम अधिका-यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलिस प्रशासनाची जबाबदारी असणार आहे. धाराशिवचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान असणार आहे. तर माजी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. स्वतंत्रपणे त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
रितू खोकर ह्या पाणीपत जिल्ह्यातील रहिवाशी असून २०१८ च्या बॅचमधील यूपीएससी उत्तीर्ण उमेदवार आहेत. त्यांचे वडिल गावचे माजी सरपंच होते. रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक १ मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिका-यांची खांदेपालट करण्यात आली आहे.