सिंगपोरा : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील चतरू येथील सिंगपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे उद्या आणण्यात येणार आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
शहिद संदीप पांडुरंग गायकर गेल्या सहा ते सात वर्षांपासून सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. मात्र, २१ मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन दरम्यान जोरदार गोळीबार सुरू आहे.
या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. ऑपरेशन अजूनही सुरू आहे असे पोस्ट व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्स हँडलवरून केली. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती भारतीय सैनिकांना मिळाली. यानंतर भारतीय सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम सुरूच आहे.