वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकी ज्यूइश समितीचा कार्यक्रम सुरु असलेल्या एका म्युझिअमबाहेर इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचा-यांची हत्या करण्यात आली आहे. नॉर्थवेस्ट डीसी येथील एफबीआयच्या वॉशिंग्टन फील्ड ऑफिसपासून काही अंतरावरच ही गोळीबाराची घटना घडली.
वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल ज्यूइश म्युझियमबाहेर हा गोळीबार झाला. यात दोन इस्रायली कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी गृह सुरक्षा विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी केली. इस्रायली दूतावासातील दोन कर्मचा-यांच्या हत्येप्रकरणी आम्ही सक्रियपणे चौकशी करत आहोत आणि अधिक माहिती सामायिक करण्यासाठी काम करत आहोत.
हल्लेखोर गोळीबारावेळी ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे ओरडत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एकजण आत आला आणि त्याने ही घटना पाहिल्याचे सांगितले. तसेच पाणी मागू लागला. लपण्यासाठी जागा हवीय असे देखील म्हणाला, असे अन्य प्रत्यक्षदर्शीने सांगितले. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुस-याला गंभीर अवस्थेत डीसी रुग्णालयात नेण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी याला ज्यूंविरुद्ध दहशतवादी कृत्य म्हटले आहे. तसेच लाल रेषा ओलांडल्याचे म्हटले आहे. हा हल्ला झाला तेव्हा तिथे इस्रायली राजदूत उपस्थित नव्हते, असे इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले.