चोंगजिन : वृत्तसंस्था
उत्तर कोरियाच्या नौदलाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर कोरियामध्ये रशियन मदतीने तयार केलेली युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली. ही घटना चोंगजिन बंदरावर घडली, यावेळी किम जोंग उन स्वत: उपस्थित होते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या हुकूमशहा किम जोंग उन यांनी शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
रॅम्पवरून खाली उतरताना युद्धनौकेचा तोल गेला. फ्लॅटकॅप वेळेत हलला नाही, यामुळे जहाज झुकले आणि ते कोसळले. किम जोंग उन यांनी या अपघाताचे वर्णन ‘गंभीर अपघात आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा’ असे केले. त्यांनी शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि शिपयार्ड कामगारांवर पूर्णपणे बेजबाबदार आणि अवैज्ञानिक वृत्तीचा आरोप केला. या चुकीबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी वर्कर्स पार्टीची आपत्कालीन बैठक बोलावण्याचे आदेशही दिले.
हे जहाज उत्तर कोरियाच्या आधुनिक विध्वंसकांच्या श्रेणीचा एक भाग होते, याचे अनावरण २५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. ते अणु क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होणार होते. किम जोंग उनने त्यांच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचेही निरीक्षण केले आणि पुढील वर्षापासून त्याचा नौदलात समावेश होणार होता.
रशियन मदतीने जहाजाची बांधणी
हे जहाज रशियाच्या तांत्रिक मदतीने बांधले होते. उत्तर कोरियाचे नौदल दक्षिण कोरियाच्या तुलनेत कमकुवत मानले जात असले तरी, हे नवीन जहाज त्यांची लष्करी ताकद आणि प्रहार क्षमता लक्षणीयरीत्या वाढवू शकते.