लातूर : प्रतिनिधी
आयटी कंपन्यांमध्ये नोक-या मिळविल्या. त्यामध्ये अधिकाधिक कौशल्य दाखवून पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, नव्याने आलेल्या एआय तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या बुद्धीचा अधिक वापर करुन जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
येथील कॉक्सिट महाविद्यालयातील १७३ विद्यार्थ्यांना यावर्षात विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीत नोक-या मिळाल्या आहेत. त्यांच्यासह पालकांचा कॉक्सिट महाविद्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. चासकर बोलत होते. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. ए. जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्रबंधक संतोष कांबळे उपस्थित होते. डॉ. चासकर म्हणाले, पुढील ३० वर्षांचा वेध घेऊन डॉ. एम. आर. पाटील यांनी संगणक महाविद्यालयाची स्थापना केली. याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आयटी क्षेत्रात उच्च पदांवर देश-विदेशात कार्यरत आहेत. हे महाविद्यालयाचे काम कौतुकास्पद आहे.
कॉक्सिट मराठवाड्यात एकमेव महाविद्यालय आहे. इतर महाविद्यालयांनी या महाविद्यालयाचा आदर्श घ्यावा. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेण्याची गरज आहे. इतर महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना कौशल्यक्षम बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रत्येक महाविद्यालयात एक कौशल्य धोरण राबवावे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, प्रभावी संवाद कौशल्य असल्यास आयटी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानातील क्रांतीचा भाग असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) महत्व सांगितले. ’एआय’वर पूर्णत: अवलंबून न राहता स्वत:च्या बुद्धीचा वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस मुलाखतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची, म्हणजेच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच न थांबता पुढील शिक्षणही सुरु ठेवावे. त्यांना त्यांच्या क्षेत्रात उत्तम जॉबच्या संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. प्रास्ताविक ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुषमा मुंडे व प्रा. आरती पाटील यांनी केले.