लातूर : मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. पावसाचा हा वेग कायम राहिल्यास मांजरा, तावरजा व तेरणा नदीवरील प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारे लवकरच निर्धारित पाणी पातळीपर्यंत भरतील, अशी शक्यता आहे. यामुळे प्रकल्पांमध्ये येणारे अतिरिक्त पाणी मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांमार्फत सोडावे लागेल. या पार्श्वभूमीवर मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठावरील शेतकरी तसेच नदीकाठी वस्ती करणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक प्रवेश टाळावा, तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.