मुंबई : महाराष्ट्रातील पोलिस खाते, प्रत्येक पोलिस चौकी, प्रत्येक पोलिस स्टेशन राजकारणाच्या दबावाखालीच काम करते. हुंडाबळीच्या केसेस देखील दबावाखाली चालवल्या जात असतील, आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील राजकारणात अडकलेल्या असतील, तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का?
काल धुळ्यामध्ये पाच कोटी रुपये सापडले, तिकडे ईडी का पोहोचली नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाच-पन्नास हजारांची चौकशी ईडी करते, मग काल विधिमंडळ समितीच्या अध्यक्षांच्या पीएकडे पाच कोटी रुपये सापडले, तिथे ईडी का पोहोचली नाही? तिथे विरोधी पक्षाचा कोणी असते तर ईडीच्या अधिकारी कोट आणि टाय लावून तेथे पोहोचले असते असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. ईडी म्हणजे मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या पिंज-यातील पोपट आहे असा आरोप देखील त्यांनी केला.
फडणवीस कोणाला वाचवत आहेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अंदाज समितीच्या अधिका-याच्या खोलीत सापडलेल्या रक्कम प्रकरणात एसआयटी स्थापन केल्या पेक्षा गुन्हा दाखल केला असता, पीएला ताब्यात घेतले असते, तपास ईडीकडे वर्ग केला असता, तर आम्हाला आनंद झाला असता. अशा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. या प्रकरणात त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस हे अर्जुन खोतकर यांना वाचवत आहे का? याचा खुलासा व्हायला हवा, असे देखील ते म्हणाले.
मोठी रक्कम जमा करण्याचे टार्गेट होते
या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला काल मर्यादा का नाही? त्यांच्या तपासाच्या चौकटी काय आहेत? ते अद्याप आम्हाला समजलेले नाही. त्यांच्या कालावधीमध्ये ही समिती ज्या-ज्या ठिकाणी गेली, तेथे ते कोणत्या हॉटेलमध्ये किंवा विश्रामगृहात याच महाशयांनी आपल्या बॉस साठी पैसे जमा केले, याची माहिती फडणवीस यांना हवी असेल तर ती मी त्यांना द्यायला तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन कोटी रक्कम तर क्षुुल्लक आहे. यापेक्षा मोठी रक्कम जमा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.