23.6 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमहाराष्ट्रसगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?

सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातले कसे?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट हल्ला एकनाथ शिंदेंवरही टीका

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यात घडणा-या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातील दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये एका पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून दुस-या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

हगवणेसह सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित
पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे?

शिंदेच्या सर्व आमदारांची चौकशी करा
हर्षवर्धन सपकाळ यांनी आणखी एका पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. या माध्यमातून त्यांनी शिंदेंच्या सर्व आमदारांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाचाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौ-यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे.

धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीएकडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेंच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR