चाकूर : प्रतिनिधी
शहरातील गल्ली-बोळात पाणीच पाणी साचले असून नाल्यातील घाण पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना घरासमोरील पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.शहरातील काही प्रभागात तर जणू तळ्यांचे स्वरूप आले होते. कांही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साठले होते. शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साठल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
नगरपंचायत मुख्य कमानी समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. ग्रामीण रूग्णालयाच्या बाजूस जणू तळ्यासारखे पाणी साचले होते. नाले साफसाफाई न झाल्यामुळे नालीतील घाण रस्त्यावर आल्यामुळे रस्त्यावर घाणच घाण जमली होती. पावसाचे पाणी घुसले घरात घुसल्याने नागरिकांचे हाल तसेच मोठे नुकसान झाले. विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान वीज गेल्याने आणि रस्त्यावरचे आणि नालीतील पाणी घरात घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. .नागरिक सतत नाले साफसफाईची मागणी नगरपंचायतीकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. चाकूर शहरात आणि तालूक्यात सर्वत्र या पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी उजळंब रोडवरील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील पाणी उपसण्याची वेळ आली तर काहींना घरातील पाणी बाहेर काढून देण्याची वेळ आल्याने लहान बालके आणि महिलांना नाहक त्रास सहन लागला आहे.
चाकुरातील लक्ष्मी नगर, बौध्द नगर, सुतार वाडा, पेट मोहल्ला, धनगर वाडा या भागाला व तेथील परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. जुन्या बसस्थानकाजवळील गंगाधर केराळे यांच्या दुकानात पाणी शिरुन तलावाचे स्वरूप आले आहे. बोथी रस्त्यावर ही पाणी साठल्याने नागरिकांची ताराबंळ उडाली आहे. नाल्या तुडुंब भरून वाहल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात शिरले. या साचलेल्या पाण्याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. नागरिकांना पाण्यातून चाचपडत रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.