राहुल गांधी यांचा आरोप, एस. जयशंकर यांना विचारले ३ प्रश्न
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल मोदींना भाषणांवरून घेरल्यानंतर आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर हल्लाबोल करीत ३ प्रश्न विचारले. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या एक्स पोस्टची एक क्लिप शेअर केली. त्यात जयशंकर डच ब्रॉडकास्टर एनओएसला मुलाखत देत आहेत. यामध्ये त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर प्रश्नांची उत्तरे दिली. यावर राहुल गांधी यांनी भारताला पाकिस्तानशी का जोडले गेले? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाने आम्हाला पाठिंबा का दिला नाही, ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले, अशी विचारणा करीत भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले असल्याचा आरोप केला.
दरम्यान, भाजपने राहुल गांधींनी सैन्याच्या शौर्याला कमी लेखणे थांबवावे. असे प्रश्न विचारणे थांबवावे जे विचारू नयेत. ते राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यात आणतात. त्यांच्या वक्तव्यांना बालिश वर्तन म्हणून नाकारता येणार नाही. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींना निशाण-ए-पाकिस्तान म्हटले. भारत-पाकिस्तान संघर्षावर राहुल गांधींच्या टिप्पण्यांचा वापर इस्लामाबाद भारताला बदनाम करण्यासाठी करत आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. म्हणून बेजबाबदार टिप्पण्या करून देशाची सुरक्षा धोक्यात आणणे थांबवा, असे म्हटले.
या अगोदर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३ प्रश्न विचारले. जे दहशतवाद, पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यावर होते. राहुल यांनी पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिपही जोडली होती. यामध्ये पंतप्रधान मोदी जेव्हा पाकिस्तानने यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी धाडस दाखवणार नाही, असे म्हटले, तेव्हा भारतानेही ते विचारात घेतले. मोदीजी, पोकळ भाषणे देणे बंद करा आणि तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे की नाही, हे सांगा. दहशतवादावर तुम्ही पाकिस्तानवर विश्वास का ठेवला, ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले, तुमचे रक्त फक्त कॅमे-यांसमोरच का तापते, असे प्रश्न विचारले होते.