22 C
Latur
Tuesday, May 27, 2025
Homeमहाराष्ट्रहगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

अजितदादा मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

अजित पवार म्हणाले की, वैष्णवीच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर मी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून त्यांना म्हटले होते की, जे घडले ते योग्य नाही. त्यामुळे सदर प्रकरणात कुणाचीही हयगय न करता आणि कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आला तरी न जुमानता कारवाई करा. वैष्णवीला ज्यापद्धतीने छळले आहे, त्यासंबंधित जे कुणी आरोपी असतील ते पकडले गेले पाहिजेत, असे निर्देशही मी त्यांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला अटक केली. तसेच सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते, पण आता त्यांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, कस्पटे कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. न्यायालयात खटला ताकदीने चालावा यासाठी चांगला सरकारी वकील देण्याची आमची तयारी आहे. कस्पटे कुटुंबियांकडून काही नावे सुचविण्यात आली आहेत. सरकारी वकिलावर कुणाचाही दबाव येता कामा नये, याची आमच्याकडून खबरदारी घेतली जाईल. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहोत. त्यावेळी दोन तास आम्ही विमानात एकत्र असू. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR