मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेते ‘सन ऑफ सरदार’ फेम मुकुल देव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. यादरम्यान नवी दिल्लीत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचा भाऊ राहुल देव असा परिवार आहे.
‘सन ऑफ सरदार’मध्ये मुकुल यांच्यासोबत काम केलेले विंदू दारा सिंग यांनी पोस्ट करत मुकुल देव यांच्या निधनाची पुष्टी केली. मुकुलला आता मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाहीत असे म्हणत त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
मुकुलची मैत्रीण आणि अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिने इन्स्टाग्रामवर मुकुल देवसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. दीपशिखाने सांगितले की, मुकुलने कधीही त्याच्या तब्येतीबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. त्याच्या मित्रांचा व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप आहे तिथे तो काहीतरी शेअर करत असे. ‘सकाळी मला त्याच्याविषयी बातमी कळाली. यावर माझा विश्वासच बसेना. तेव्हापासून मी त्याच्या नंबरवर फोन करत आहे, तो फोन उचलेल या आशेने,’ असे ती भावूक होत म्हणाली.
मुकुल यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांसह टीव्ही मालिका आणि म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. काही बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘यमला पगला दीवाना’मधील भूमिकेसाठी त्यांना ७ व्या अमरीश पुरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दिल्लीत जन्मलेल्या मुकुल यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावरील आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. या मालिकेत त्यांनी विजय पांडेची भूमिका साकारली होती. त्यांनी दूरदर्शनवरील ‘एक से बढकर एक’ या कॉमेडी बॉलिवूड काऊंटडाऊन शोमध्येही काम केले. त्यांनी १९९६ मध्ये सुष्मिता सेन सोबत ‘दस्तक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘किला’ (१९९८), ‘वजूद’ (१९९८), ‘कोहराम’ (१९९९) आणि ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ (२००१) आणि इतर अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.