मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५ रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई ३५, पुणे महापालिका ४, रायगड २, कोल्हापूर महापालिका २, ठाणे महापालिका १ आणि लातूर महापालिका १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू असून, गेल्या २४ तासांत आणखी ४५ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ४ जणांना संसर्ग झाला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकूण १७७ रुग्ण आढळले आहेत.
राज्यात १ जानेवारी ते २३ मेपर्यंत कोरोनाच्या ६ हजार ८१९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २१० रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ८१ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी फ्लू आणि श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण सध्या तुरळक आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. शासकीय रुग्णालयांत कोरोना तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ७३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून, तो सहव्याधिग्रस्त होता. राज्यात याआधी कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम या मूत्रपिंड विकारासह हायपोकॅल्सिमिक सीझर हा चेताविकार होता, तर दुस-या रुग्णास कर्करोग होता. हे दोन्ही रुग्ण सहव्याधिग्रस्त होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, फक्त मुंबईत नाही तर हरियाणा, गुरगाव आणि फरिदाबाद या ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरगावमध्ये २ रुग्ण आढळले आहेत. तर १ फरिदाबादमध्ये आढळला आहे. तर गुरगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेली महिला ही नुकतीच मुंबईहून परतली होती.