सांगली : चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वैद्यकीय शिक्षण घेणा-या एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणीला गुंगीचे कोल्ड्रिंक्स देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयित तरुणांना अटक केली असून, न्यायालयाने तीन संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणा-या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परराज्यातील तरुणीबाबत सदरचा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीबरोबर शिक्षण घेणा-या मित्रांनीच हा सामूहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत विश्रामबाग पोलिस यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पीडित तरुणी ही वैद्यकीय शिक्षण घेत असून, ती तिस-या वर्षात शिकत आहे. मंगळवारी सदर तरुणी चित्रपट पाहण्याच्या कारणाने तिच्याबरोबर शिक्षण घेणा-या दोन मित्रांसोबत महाविद्यालयातून बाहेर पडली. ती मित्राच्या रूममध्ये गेली असता, तिच्या मित्रांचा एक मित्र देखील तिथे आला होता. यावेळी तरुणीला गुंगीकारक कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी देण्यात आले.
त्यानंतर गुंगीत असलेल्या तरुणीवर तिघा मित्रांनी दारूच्या नशेत सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणीने आपली सुटका करत थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठत, घडलेल्या प्रकाराबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.