मलकापूर : प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूट करण्यासाठी राज्यभरात रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचे रॅकेट चालविणा-यांचा छडा लावण्यात मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाला यश आले. मलकापूर येथील पब्लिक रिझर्व्हेशन सेंटरवर (पीआरसी) केलेल्या कारवाईनंतर या टोळीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली, पकडण्यात आलेल्या दोघांचे मुंबईतून रॅकेट चालविणा-या कुख्यात ठाकूरसोबत कनेक्शन असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
काळाबाजार करणा-या संजय चांडक आणि प्रसादची चौकशी केली असता या दोघांचा मुंबईतील कुख्यात ठाकूर टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. हा ठाकूर संपूर्ण राज्यात रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजाराचे नेटवर्क चालवितो, अशी कारवाई करणा-या अधिका-यांना शंका आहे.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, संजय चांडक कुख्यात ठाकूर गँगशी सलग कनेक्ट असल्याचे भक्कम पुरावे पुढे आले आहेत. चांडकच्या मोबाइलवरून मुंबईतील ठाकूर गँगसोबत झालेली व्हॉटस्अॅप चॅटची हिस्ट्रीही कारवाई करणा-या पथकाच्या हाती लागली आहे.