जळगाव : नाशिकच्या पालकमंत्रिपदावर कुणीही दावा करू शकतो, पण पालकमंत्री कुणाला करायचे हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे असे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनात आणले तर ते छगन भुजबळांना पालकमंत्री करतील, राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील असे वक्तव्यही गिरीश महाजन यांनी केले. त्यावर नंतर त्यांनी सारवासारवही केल्याचे दिसून आले.
छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर ते आता नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्रीपदावर कुणीही दावा करू शकतो. त्याला काहीच हरकत नाही. पण हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. त्यांनी जर मनात आणले तर भुजबळांना पालकमंत्री करतील. फडणवीस भुजबळांना राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्रीही करू शकतील. छगन भुजबळांनी असा कोणताही दावा केला नाही, उगाच अशा चर्चा करुन तेल ओतू नका अशी सारवासारव नंतर गिरीश महाजनांनी केल्याचे दिसून आले.
रोहिणी खडसेंच्या पत्राचा विचार करतील
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी त्यांचे कर्तव्य बजावले नाही, त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद कस्पटे कुटुंबीयांना मिळाला नाही अशी तक्रार करत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोहिणी खडसेंच्या पत्राचा विचार करतील.