23.2 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeराष्ट्रीय२०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने मिळून विकासाला गती द्यायला हवी

२०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने मिळून विकासाला गती द्यायला हवी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०४७ मध्ये भारत एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपल्याला विकासाची गती वाढवावी लागेल. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन टीम इंडियाप्रमाणे काम केले तर भारताला हे लक्ष्य गाठणे अजिबात अशक्य नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे लक्ष्य आहे. जेव्हा प्रत्येक राज्य विकसित होईल, तेव्हा भारत विकसित होईल. १४० कोटी नागरिकांची हीच अपेक्षा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलची १० वी बैठक शनिवारी (२४ मे) पार पडली. नवी दिल्लीत ही बैठक पार पडली. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून कसे नावारुपाला आणता येईल, हा या बैठकीचा मुख्य विषय होता. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. भारतात शहरीकरणाची गती वाढली आहे. भविष्यासाठी तयार असणा-या शहरांना समोर ठेवून आपण काम केले पाहिजे.

विकास, नवोन्मेष तसेच शाश्वतता हे आपल्या शहरांच्या विकासासाठीचे इंजिन असायला हवे. देशातील प्रत्येक राज्याने वैश्विक मानकांना लक्षात घेऊन एक तरी पर्यटनस्थळ विकसित करायला हवे. त्या पर्यटन स्थळांवर सर्व पायाभूत सुविधा असायला हव्यात. एका राज्यात एक जागतिक स्थळ असायलाच हवे. यामुळे त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या शहरांचाही पर्यटन स्थळ म्हणून विकास होईल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

गुंतवणूकदारांना आकर्षित करा
नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाला एक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी अनुकूल प्लॅन तयार करा, असे निर्देश दिले. सोबतच जगभरातील गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सर्व राज्यांनी याकडे एक संधी म्हणून पाहावे आणि या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण द्यायला हवे
युवकांना रोजगार सक्षम करण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण द्यावे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. सोबतच महिलांमध्ये असलेल्या शक्तींचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR