नागपूर : राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका वर्षाची चिमुरडी ते ६०-६५ वर्षांची वृद्ध महिलाही त्याला बळी पडताना दिसत आहे. परंतु नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षांच्या तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची घटना घडली.
शहरातील घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. छोट्या सुंदर खोब्रागडे असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नागपुरातील खाणी परिसरात एक घोडेस्वारी अकादमी आहे. १७ मे रोजी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाने या अकादमीच्या आवारात एक संशयास्पद व्यक्ती पाहिली आणि अकादमी संचालकांना माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपीने अकादमीमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचे दिसून आले.
नागपूर पोलिसांनी या घृणास्पद कृत्याला गांभीर्याने घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे आणि तपास सुरू आहे. नागपुरात घडलेले हे प्रकरण केवळ कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक गंभीर आव्हान नाही तर समाजाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.