रायगड : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लवकरच पार पडणार आहे. याची रायगडावर जोरदार तयारी देखील सुरु आहे. तारखेप्रमाणे दर वर्षी हा सोहळा ६जून रोजी रायगडावर साजरा केला होता. राज्यासह देशभरातून शिवभक्त रायगडावर जमत असतात. मात्र आता राज्याभिषेक सोहळ्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी ६ जून रोजी होणा-या या सोहळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यभिषेक उत्सव समितीने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी शुक्रवारी (दि.२३) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी ६ जून असणारा शिवराज्यभिषेक दिन नामशेष केला पाहिजे या आशयाचे वक्तव्य केले. यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी तारखेप्रमाणे करण्यास भिडे गुरुजींना नकार दिला. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत तिथीप्रमाणे सोहळे साजरे करण्याचे सांगितले. मात्र यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे म्हणाले की, यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरातून गावागावातून उत्साहाने मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमी जमाणार आहेत.
६जूनलाच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे या तारखेलाच हा सोहळा होणार आहे. जरी कोणी काहीही म्हणत असेल सोहळा रद्द केला पाहिजे किंवा काहीङ्घपण सोहळा तारखेनुसारच होईल, अशा शब्दांत समितीच्या सदस्यांनी ठणकावून उत्तर दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, यंदाही लाखोच्या संख्येने शिवभक्त गडावर येणार आहेत. भिडे गुरुजी ज्येष्ठ आहेत. मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ?, असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. शिवभक्त आणि महाराष्ट्रातील रणरागिणी बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवून या वक्तव्याचा निषेध करतील, अशा कडक शब्दांमध्ये समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी संभाजी भिडे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
संभाजी भिडे शिवराज्याभिषेकाबाबत बोलताना माध्यमांसमोर म्हणाले की, ६ जूनचा राज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे. ७६ वर्षे झाली तरीही आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांकडे स्वाधीन करुन ठेवलंय. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या तिथीप्रमाणेच शिवराज्यभिषेक स्मरण दिन केला पाहिजे. ६ जूनचा बंदच केला पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. मात्र यामुळे अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.