कोल्हापूर : प्रतिनिधी
सध्याच्या डिजिटल युगात पेनने लिहिण्याची पारंपारिक पद्धत नष्ट होत चालली आहे. मात्र, कधीकाळी पेनाशिवाय काहीच साध्य व्हायचे नाही अशा काळातील दुर्मीळ आणि नामवंत ब्रँड्सचे पेन कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिवलमध्ये पाहायला मिळत आहेत.
अगदी १०० रुपयांपासून ते ८ लाख रुपये पर्यंतच्या पेनाच्या किंमती पाहून कोल्हापूरकर आश्चर्यचकित होत आहेत. तर पुण्याच्या कलाकाराने २४ कॅरेट सोन्याचा वापर करून बनवलेला ८ लाखांचा पेन गर्दी खेचत आहे. जर्मनी, जपान आणि इटलीच्या नामवंत ब्रॅन्डच्या पेनचे दालन दोन दिवस कोल्हापुरात खुले असणार आहे.
जर्मनीत बनलेले पेन कोल्हापूरच्या प्रदर्शनात : पाश्चात देशाची संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ बाजारात असणा-या नवनवीन प्रकारच्या पेनमध्ये पाहायला मिळतो. जर्मनीमध्ये कौशल्यपूर्ण कारागिरांनी बनवलेले पेन कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिवलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं आजपासून दोन दिवस या आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिवलला सुरुवात झाली असून बॉब अँड ची या संस्थेच्या पुढाकारानं कोल्हापुरातील कलाकारांना पेनचं, त्यांना देश विदेशातील नामवंत ब्रँड आणि विविध प्रकारच्या पेनाचं महत्त्व कळावं, नामशेष होत असलेली कला भारतातील काही मोजक्याच कलाकारांनी जपली आहे या कलाकारांना आमंत्रित करून कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा फेस्टिवल भरवण्यात आला आहे.