25.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeमहाराष्ट्रबसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या

बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या

गडचिरोली : भाकप (माओवादी)चा सरचिटणीस तथा नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू याचा खात्मा २१ मे रोजी छत्तीसगड राज्यातील अबुझमाड जंगलातील चकमकीत झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न आल्याने नातेवाइकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करीत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. या याचिकेवर शनिवार, २४ मे रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने छत्तीसगड पोलिसांकडे मृतदेहासाठी मागणी करावी असे मत नोंदवित याचिका निकाली काढली.

छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यात बसवा राजूचाही समावेश होता. बसवा राजूच्या खात्म्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांनी धडपड सुरू होती. मात्र, शवविच्छेदनासह इतर तपासण्यांचे कारण देत त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेला नव्हता. छत्तीसगड पोलिसांकडून होत असलेला विलंब लक्षात घेऊन बसवा राजूच्या नातेवाइकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करीत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली.

मृतदेह लवकरच देणार
शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेत याचिकाकर्त्यांना मृतदेहासाठी छत्तीसगड पोलिस प्रशासनाकडे मागणी करण्याची सूचना केली. यावेळी छत्तीसगडच्या महाधिवक्त्यांनीही लवकरच शवविच्छेदन आणि तपासणी पूर्ण होणार असल्याचे सांगून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करणार, असे न्यायालयात सांगितले.

अंत्ययात्रा उत्सवाची पोलिसांना धास्ती?
गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविल्यानंतर शांततेत अंत्यसंस्कार पार पाडले जातात. मात्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मृत नक्षल नेत्यांची अंत्ययात्रा वाजतगाजत, गाणी गात काढली जाते. सामान्य लोकांसह समविचारी राजकीय पुढारीसुद्धा अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. उत्सवाप्रमाणे अंत्यविधी पार पाडला जातो. गत महिन्यात महिला नक्षलीच्या अंत्ययात्रेचे फोटो व व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बसवा राजू हा मोठा नक्षली नेता असल्याने कदाचित याचीच धास्ती पोलिसांना असावी असाही कयास लावला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR