रियाध : सौदी अरेबिया त्याच्या इस्लामिक रीतिरिवाजांसाठी आणि अतिशय कडक शरिया कायद्यांसाठी ओळखला जातो. पण, काळानुरुप तो हळुहळू बदलत चालला आहे. अशातच, सौदी एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. ज्या देशात गेल्या ७३ वर्षांपासून दारुवर पूर्णपणे बंदी होती, तिथे आता २०२६ पासून निवडक ठिकाणी दारुची विक्री आणि मर्यादित वापर करण्यास परवानगी असेल.
सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला पर्यटन आणि जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की, इस्लाममध्ये हराम मानली जाणारी गोष्ट आता सौदीच्या आधुनिक प्रतिमेचा भाग बनेल का? सौदी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा बदल पूर्णपणे नियंत्रित परवाना प्रणाली अंतर्गत केला जाईल.