नवी दिल्ली : पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून (१० डिसेंबर) सुरुवात होत आहे. शक्य आणि इच्छा असूनही काही व्यक्ती नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागल्याने या सगळ्या अनुभवापासून दूर असतात. पण, खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेचा पडदा आज उघडला जाणार आहे. देशभरातील पॅरा खेळाडू त्यानंतर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी मैदानात उतरतील. महाराष्ट्रातील खेळाडू देखील यात मागे नसून सर्वोत्तम यशासाठी उत्सुक व या स्पर्धा सुरु होण्याची वाट बघत आहेत. महाराष्ट्राला तिरंदाजी आणि नेमबाजीमधून देखील अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीचा फायदा मिळणार आहे. आशियाई स्पर्धेचा अनुभव असलेला आदिल महंमद नाझिर अन्सारी हा रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राचे आशास्थान असेल. याशिवाय कम्पाऊंड प्रकारात पूनम दुसेजा आणि अभिषेक ताव रे यांच्याकडूनही महाराष्ट्राला पदकाच्या आशा आहेत.
पॉवरलिफ्टिंगमध्ये देविदास झिटे (४९ किलो) आणि दिनेश बगाडे (१०७ किलो) आपले कौशल्य पणाला लावतील. पदकांची संख्या वाढवणारा आणखी एक प्रकार म्हणजे नेमबाजी. या स्पर्धा प्रकारातही महाराष्ट्राला चांगल्या यशाची खात्री आहे. यामध्ये पॅरा ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेला स्वरूप उन्हाळकर याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जात आहेत. राघव बारावकर, रेखा पडवळ आणि शंतनु हे देखिल आपला अनुभव पणाला लावणार आहेत.