छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर त्यांच्या पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने छत्रपती संभाजीनगरचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये सिद्धांत यांच्याविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जान्हवी सिद्धांत शिरसाट असे या महिलेने आपले नाव लावले आहे. वकिलामार्फत असा दावा करण्यात आला आहे की, सिद्धांतने जान्हवीशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर त्यांनी जान्हवीला नांदवायला नकार दिला. जान्हवीने छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिले नाही. तिला मुंबईतच राहण्यास सांगितले गेले, आणि तिथे महिलेवर अन्याय-अत्याचार करण्यात आला, असा आरोप वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी केला आहे. संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत महत्त्वाच्या जबाबदारीवर असलेले मंत्री आहेत, ज्यामुळे हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनले आहे.
या प्रकरणात वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी पुढे असेही सांगितले की, ‘चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी जान्हवीसोबत सिद्धांतने लग्न केले. फॅमिलीसोबत रीतीरिवाजानुसार लग्न झाले. दोन वर्षे चांगली गेली. पण नंतर सिद्धांतचे तिस-या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि मानसिक छळ सुरू केला. तो तिला इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा.
सिद्धांतने जान्हवीला संभाजीनगरला कधीच येऊ दिले नाही, उलट संभाजीनगरला आलीस, तर तंगडं तोडू, अशी धमकी दिली, असाही आरोप करण्यात आला आहे. ‘सात दिवसांच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे. अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करू,’ असा इशारा जान्हवीचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे.
या गंभीर आरोपांमुळे संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासात काय सत्य समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.