हदगाव : मुसळधार पावसाने अनाचक नाल्याला आलेल्या पुरात एका महिलेसह २ चिमुकल्या मुली वाहून गेल्या. सदर घटना वरवट येथे मंगळवार २७ मे रोजी दुपारी घडली. यात २ चिमुकल्यांचे मृतदेह सापडले असून महिलेचा शोध सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाचे थैमाण सुरू आहे. हदगावमधील वरवट येथे २७ मे रोजी दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला तो तब्बल दीड तास चालू होता. यामुळे शेतात मजुरीला गेलेली वरवट येथील महिला अरुणा बळवंत शकिरगे वय २५ ही पावसामुळे घराकडे परत निघाली.
तेव्हा गावातील नाल्याला पूर आला, या पुरातून एका मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करताना स्वत: अरुणा शकिरागे, मुलगी दुर्गा बळवंत शकिरगे वय ९ आणि पुतणी अंकिता विजय शकिरगे वय ५ या पुरात वाहून गेल्या. सदर वृत्त लिहीपर्यंत दुर्गा व अंकिता या दोन्ही मुलींचा मृतदेह सापडला मात्र महिलाचा शोध सुरू होता. हदगावसह हिमायतनगर, माहूर या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे गावालगतचे अनेक नाले ओसंडून वाहत आहेत.