पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात महिला आयोगाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला. याच पार्श्वभूमीवर महिलांना तातडीची मदत मिळावी यासाठी कार्यरत असलेले महिला आयोगाचे संपर्क क्रमांक सध्या बंद असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महिला आयोगाचे अधिकृत संपर्क क्रमांक(०२२) २६५९२७०७ आणि हेल्पलाईन नंबर १५५२०९ हे दोन क्रमांक आहेत. सध्या त्यापैकी संपर्क क्रमांक बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. डझ नॉट एक्झिस्ट” असा मेसेज या नंबरवर कॉल केल्यावर ऐकायला मिळतो. फोनवर महिला आयोगच अस्तित्वाच नसल्याचा संदेश येत असल्याचा थेट अनुभव अनेकांनी घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेच्या पदाधिका-यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे. सामान्य महिलांना संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी कोणाकडे जायचे? सरकारी यंत्रणा अस्तित्वात असताना जर संपर्कच होत नसेल, तर त्या यंत्रणेचे अर्थ काय? असा प्रश्न मनसे पदाधिका-यांनी उपस्थित केला आहे. या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचे स्पष्ट झाले.
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप महिला आयोगाने किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मनसेकडून थेट मुख्यमंत्री आणि जिल्हाधिका-यांना पत्र पाठवल्यामुळे आता याकडे गांभीर्याने पाहिले जाईल अशी अपेक्षा आहे.