अबुधाबी : संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये पहिले हिंदूमंदिर बांधले जात आहे. अबुधाबीमध्ये उभारण्यात येणा-या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल ७० हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी एकूण ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात यूएईला भेट देऊन या मंदिराचे उद्घाटन करू शकतात.
बोचासन निवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था या मंदिराची उभारणी करत आहे. याच संस्थेने दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नुकतेच आशिया बाहेरचे सर्वात मोठे मंदिर बांधले आहे. बीएपीएसने जगभरात ११०० हून अधिक हिंदू मंदिरे बांधली आहेत. अबुधाबीमध्ये बांधण्यात येत असलेल्या हिंदूू मंदिराची उंची १०८ फूट आहे. या मंदिरात ४० हजार घनमीटर संगमरवरी आणि १ लाख ८० हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला आहे. मंदिरात स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या आहेत. मंदिराच्या बांधकामात ५० हजारांहून अधिक लोकांनी योगदान दिले आहे. यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अभिनेता संजय दत्त आणि अक्षय कुमारसह अनेकांचा समावेश आहे. मंदिर परिसरात मोठे गार्ड आणि लहान मुलांसाठी खेळाचे मैदानही असेल.
पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
या मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार असून त्यात अनेक मान्यवरही सहभागी होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला पीएम मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात. अबुधाबीमध्ये १० फेब्रुवारीपासून फेस्टिव्हल ऑफ हार्मनी सुरू होत आहे, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
महामार्गावर भारताला १७ एकर जमीन भेट
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौ-यावर होते आणि यावेळी तेथील राष्ट्रपतींनी अबुधाबी-दुबई महामार्गावर भारताला १७ एकर जमीन भेट दिली होती. याच जागेवर हे मंदिर उभारले जात आहे. मंदिराचे बांधकाम २०१५ पासून वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर बांधण्यासाठी स्टील किंवा काँक्रीटचा वापर केला गेला नाही. मंदिर इतके मजबूत केले आहे की ते पुढील १००० वर्षे अबाधित राहील.