सोलापूर : आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबविण्यासाठी ग्रामविकास विभागाने बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, मुदत संपूनही शिक्षकांना जिल्हानिहाय रिक्त पदांची माहितीच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे मुदतीत कार्यवाही न झाल्याने नवीन शासन निर्णय अपेक्षित असतानाही तो निघाला नाही. आता शिक्षकांना अर्जासाठी १५ डिसेंबरपर्यंत तोंडी मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील झेडपी शाळांमधील जवळपास २३ हजार शिक्षकांची भरती जाणार आहे. त्यासाठी जवळपास दोन लाख ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. सध्या आंतरजिल्हा बदलीस पात्र व नव्याने पात्र झालेल्या शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची संधी दिली जात आहे. ग्रामविकास विभागातर्फे हा आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबविला जात आहे. ग्रामविकास विभागाने ३० नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आदेश काढला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत असल्याचे आदेशात नमूद केले होते. आता ही मुदत संपली तरी अजूनपर्यंत एकाही उमेदवाराला अर्ज करता आलेला नाही.
२०२२मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेस ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, पण ही प्रक्रिया राबविताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागांअभावी बदली मिळाली नाही. अशांना २०२२मध्ये भरलेल्या अर्जात जिल्हा बदलण्यास ‘एडीट’ची संधी मिळणार आहे. नव्याने बदलीस पात्र झालेल्यांनासह यापूर्वी बदलीसाठी अर्ज न केलेल्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येईल. त्यानुसार ६ डिसेंबरपर्यंत संबंधितांनी अर्ज करावेत, अशी अंतिम मुदत दिली होती. आता ही मुदत संपली, तरीदेखील त्यांना कोणत्या जिल्ह्यात संवर्गनिहाय किती जागा रिक्त आहेत ही माहितीच उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे सांगितले जात आहे, पण त्यासंबंधीचा शासन निर्णय निघालाच नाही.
शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदनिहाय रिक्त शिक्षकांची पदे किती आहेत, कोणत्या संवर्गातील आहेत याची माहिती ग्रामविकास विभागाला दिली आहे. शिक्षण सेवकाचा कालावधी संपून सहशिक्षक झालेले जवळपास दीड हजार शिक्षक व इतर साडेनऊ हजार शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून स्वजिल्ह्यात जाण्याची संधी मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नवीन शिक्षक भरती होणारच नाही, हे निश्चित आहे.