इस्लामाबाद : भारतात नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचा तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. यातच आता, अमेरिकास्थित पाकिस्तानी वंशाचे व्यापारी तथा राजकीय तज्ज्ञ साजिद तरार यांनीही भाजपच्या या विजयासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते एका शोमध्ये बोलत होते.
पाकिस्तानी जर्नलिस्ट कमर चीमाच्या शोमध्ये साजिद तरार यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत टॉप ५ ग्लोबल पॉवर्समध्ये समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा भारताचे पंतप्रधान होतील. देशातील राजकारणावर त्यांची जबरदस्त पकड आहे. तर विरोधक असंघटित असून त्यांच्याकडे असा कुठलाही नेता नाही, जो पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकेल. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. ज्यांनी स्वत:च्या बळावर भारताला पुढच्या रांगेत पोहोचवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि लवकरच टॉप ३ मध्येही येईल असेही तरार म्हणाले. याच वेली त्यांनी भारतासाठी यशस्वी ठरलेल्या तीन गोष्टींवरही भाष्य केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी परराष्ट्र दौरे, चंद्रयान आणि ग्लोबल साऊथची प्रगती, हे सर्व भारताला एक मजबूत जागतिक शक्ती म्हणून पुढे नेत आहे.
भारताच्या यशामागचे गमक गंभीर शासन
तरार म्हणाले, भारताच्या यशामागचे गमक गंभीर शासन आहे. भारताच्या प्रगतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे पंतप्रधान मोदींसारखा राष्ट्रवादी नेता त्याचे नेतृत्व करत आहे आणि भविष्यातही तेच नेतृत्व करतील. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याकडेही लक्ष आकर्षित केले, ज्यात त्यांनी अमेरिका आता सुपरपावर नाही, असे म्हटले होते. याच बरोबर, आता भारत क्षेत्रीय शक्तीपेक्षाही अधिक जास्त पुढे गेला आहे असेही तरार म्हणाले.