रायपूर : वृत्तसंस्था
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत भाजपने विजय मिळवला. त्यानंतर गेल्या ७ दिवसांपासून या राज्यांत भाजप कुणाला संधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यातच छत्तीसगडमध्ये भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करीत माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साई यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. चर्चेतल्या चेह-यापेक्षा नवा चेहरा देऊन भाजप नेहमीच धक्कातंत्राचा वापर करतो. त्याचीच प्रचिती छत्तीसगडमध्ये आली.
विष्णुदेव साई हे छत्तीसगड राज्याचे भाजपचे प्रमुख होते. त्यांनी २ वर्ष भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले होते. रायगड मतदारसंघातून ते खासदार होते. भाजपने मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. विष्णुदेव साई यांना मुख्यमंत्री म्हणून राज्याची जबाबदारी दिली आहे. बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी विष्णुदेव साई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजप आमदारांनी मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
आमदारांच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अर्जुन मुंडा यांच्यासह दुष्यंतकुमार गौतम, छत्तीसगड भाजप प्रभारी ओम माथूर हजर होते. दुपारी १२ वाजता भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा झाली. या बैठकीतच साई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. विष्णुदेव साई हे कुनकुरी मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांनी काँग्रेसच्या उद मिंज यांना पराभूत केले.
रायगडमधून ४ वेळा खासदार
विष्णुदेव साई हे रायगडमधील तगडे नेते असून, ते रायगडमधून चार वेळा खासदार राहिलेले आहेत. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुकीत ते खासदार म्हणून विजयी झाले होते. केंद्रीय भाजपने त्यांना २०१९ च्या निवडणुकीत संधी दिली नव्हती. मात्र, यावेळी त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयीही झाले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ््यात पडली.