नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून पूर्ववत होणार आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापा-यांनी बेमुदत संप पुकरला होता. पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार, दि. ९ डिसेंबर रोजी व्यापा-यांमध्ये फूट पडली होती. दरम्यान, जे व्यापारी सलग ३ दिवस लिलाव बंद ठेवतील, त्यांचे परवाना रद्द करण्याचा इशारा सहकार विभागाने दिला होता. या पार्श्वभूमीवर कांदा लिलाव सुरू होणार असल्याचे समजते. मात्र, व्यापा-यांनी शेतक-यांचे नुकसान होऊ नये, म्हणून लिलाव सुरू करणार असल्याचे सांगितले.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात याचे पडसाद उमटले. १ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले असून, यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत तर काही ठिकाणी कांद्याचा लिलाव बंद पाडण्यात आला. त्यातच नाशिक जिल्ह्यातही शेतकरी, व्यापा-यांचा उद्रेक झाला होता. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलने झाली आणि लिलावही बंद पाडले. मात्र, आता सोमवारपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.