गडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे. हे नेमके कसे शक्य आहे? मतदार यादीत फेरफार करून महायुती सत्तेत आली आहे. मतांमध्येच फेरफार करणारे सरकार शेतक-यांना काय न्याय देणार? असा सवाल असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
काँग्रेसच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नांवर १२ जून रोजी येथे शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली. मोर्चा निघण्यापूर्वी जाहीर सभा झाली. यावेळी सपकाळ यांनी सत्ताधा-यांवर जोरदार निशाणा साधला. विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, आमदार रामदास मसराम, अभिजित वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजित कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर आदी उपस्थित होते. सभेनंतर चंद्रपूर रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोह आंदोलन उभे करणार
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री गडचिरोलीचा दौरा व मुक्काम कशासाठी करतात माहीत आहे. इथल्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालून जंगल उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जात आहे. सुपीक जमिनी उद्योग, विमानतळासाठी घेतल्या हिसकावून घेतल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला. मात्र, याविरुद्ध लोह आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.