नाशिक : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतक-यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतक-यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकर-यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतक-यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, तुम्ही सगळे कष्ट करतायत, पण सरकारच्या धोरणामुळे शेतक-यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरणे ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांना जाणे नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतक-यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो. त्यावेळी, भाजपचे लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतक-यांना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले, असल्याच पवार म्हणाले.
दिल्लीत जाऊन येतो, तुम्ही तयार रहा…
दरम्यान, याचवेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, २६ तारखेला प्रचंड अवकाळी गारपीट झाली. द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले. देशात साखर कारखान्याच्या बाबतीत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. ऊसापासून आपण रस काढतो, साखर काढतो आणि इथेनॉल तयार करतो. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने निर्णय घेतला, ज्यात इथॉनल आणि रसावर बंदी आणण्यात आली. शेतकरी हिताचे निर्णय कधी घेतले जात नाही.त्यामुळे, आज जो कार्यक्रम तुम्ही केला, यातून केंद्र सरकारने संदेश घ्यावा.