बंगळूरू : एकीकडे काँग्रेसने तेलंगणात सत्ता काबीज केली, तर दुसरीकडे काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलर नेते एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकार फार काळ टिकणार नसून ते लवकरच पडेल. राज्यातील एक मोठा मंत्री ५० हून अधिक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी रविवारी हसनमध्ये मीडियाशी बोलताना दावा केला की, पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कधीही पडेल. काँग्रेसमधील वरिष्ठ मंत्र्यांला त्यांच्यावरील खटल्यातून सुटायचे आहे, त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी चर्चा करत आहेत. हे मंत्री ५० ते ६० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. सध्या भाजप नेत्यांशी चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.
कुमारस्वामी पुढे म्हणाले की, राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये काहीच ठीक सुरू नाहीय. हे सरकार कधी पडेल माहीत नाही, पण एक मंत्री आपल्यावरील खटले टाळण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी करण्यास इच्छूक आहे. कुमारस्वामींना त्या नेत्याचे नाव विचारले असता ते म्हणाले की, छोट्या नेत्यांकडून अशी धाडसी पावले उचलण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. अशा गोष्टी फक्त प्रभावशाली नेताच करू शकतो. लोकसभा निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते, असा अंदाज जेडीएस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
कोणताही नेता प्रामाणिक नसतो
जेडीएस नेते कुमारस्वामी पुढे म्हणतात, सध्याचे राजकीय वातावरण पाहता काहीही होऊ शकते. महाराष्ट्रासारकी परिस्थिती कर्नाटकात घडू शकते. कोणताही नेता पक्षाशी प्रामाणिक किंवा बांधील राहिलेला नाही. प्रत्येकजण त्यांचे वैयक्तिक फायदे पाहतात. राजकारणात हे नेहमीच घडले आहे. जेव्हा एखादा राजकारणी त्याच्या सोयीसाठी पक्ष बदलतो तेव्हा विचारधारा मागे राहते.