इंदूर : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा त्यांना सुपूर्द केला. मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी राजभवन गाठून राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
तसेच शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून मोहन यादव यांचे अभिनंदन केले असून भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधानांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली तुम्ही मध्य प्रदेशची प्रगती आणि विकास कराल.
तसेच तोमर यांची मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षपदाची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तुमचे कुशल मार्गदर्शन आणि अनुभव राज्याच्या विकास आणि लोककल्याणाच्या कामांना नक्कीच अधिक चालना देईल, असे ते म्हणाले. खांडवा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करताना सोमवारी त्यांनी म्हटले की, जनतेने भाजपला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार आपल्या प्रत्येक संकल्पाची पूर्तता करून जनतेचा हा विश्वास आणखी दृढ करेल.