लातूर : प्रतिनिधी
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २३ जून २०२५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लातूर जिल्ह्यात १ ते १५ जुलै या कालावधीत शाळाबा बालकांचा शोध घेण्याची मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी तालुका गटशिक्षणाधिका-यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान खालील चार प्रकारच्या बालकांचा शोध घेतला जाईल: कधीच शाळेत दाखल न झालेली बालके, सलग ३० शालेय दिवस अनुपस्थित असलेली बालके, कुटुंबासह स्थलांतरित होऊन येणारी बालके, कुटुंबासह स्थलांतरित होऊन जाणारी बालके. सर्वेक्षण बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सिग्नल, हॉटेल, खानावळी, साखर कारखाने, विटभट्टी, दगडखाणी, एमआयडीसीतील कारखाने यासारख्या ठिकाणी केले जाईल. या सर्वेक्षणातून आढळलेल्या शाळाबा आणि स्थलांतरित बालकांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करण्यात येईल.
या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. हंगामी कामासाठी स्थलांतरित होणा-या बालकांना शिक्षण हमी पत्रक देण्यात येईल. तसेच, शासनाने विहित केलेल्या अ, ब, क, ड प्रपत्रांमध्ये माहिती भरून, ती अचूकपणे एक्सल आणि गुगल शीटमध्ये १ ते १५ जुलैदरम्यान दररोज नोंदवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. दत्तात्रय मठपती आणि उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. प्रमोद पवार यांनी केले आहे. शाळास्तरावर मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.