लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेअंतर्गत खेळवण्यात येणा-या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगला आहे. दुस-या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीनंतर गोलंदाजीत छाप सोडत दुसरा दिवसही आपल्या नावे केला आहे. हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाने सामन्यावर पकड मिळवल्याचे दिसते.
भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावा केल्यावर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेला भेदक मारा आणि स्लिपमध्ये जागता पहारा देत क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर दुस-या दिवसाअखेर भारतीय संघाने इंग्लंडला ८ व्या षटकात अवघ्या २५ धावांवर तीन धक्के दिले. दुस-या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या होत्या. जो रुट ३७ चेंडूचा सामना करून १८ धावांवर खेळत होता. दुस-या बाजूला हॅरी ब्रूक याने ५३ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ३० धावा केल्या होत्या.