नागपूर (प्रतिनिधी) : राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला भाजपाच्या आंधळ्या, बहि-या, मुक्या सरकारला वेळ नाही. राज्यात भीषण पाणीटंचाई आहे, एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसानेही शेतक-यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांनी आज केली. केंद्रातील भाजपा सरकार गेली ९.५ वर्षे लोकशाहीची पायमल्ली करीत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करून सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवावेच लागेल, असा निर्धार काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चासमोर बोलताना नेत्यांनी व्यक्त केला.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज दिक्षाभूमी ते विधान भवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनील केदार, डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मॉरिस कॉलेजजवळ मोर्चा अडवण्यात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
मोर्चाला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्र आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगली घडवण्यात देशात १ नंबरवर आहे. या सरकारला शेतक-यांचे देणे-घेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षक भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत; पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमा भागात काँग्रेस पक्षाला मोठे जन समर्थन मिळालेले आहे. या भागातून ७५ ते १०० टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजपा म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमध्ये धानाला ३१०० रुपये भाव व १ हजार बोनस देण्याची तसेच ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करतात मग महाराष्ट्रात का देत नाहीत? याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्लाबोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरी, बेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत; पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते; पण पुर्तता करीत नाही. विमा कंपन्या शेतक-यांना फसवून लुटत आहेत; पण सरकार त्यावर काहीच करीत नाही. केंद्रातील भाजपा सरकार गेली ९.५ वर्षे लोकशाहीची पायमल्ली करीत कारभार करीत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करून सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे.