मुंबई : वृत्तसंस्था
भांडवली बाजार नियामक असलेल्या ‘सेबी’ने अमेरिकेच्या जेन स्ट्रीट ग्रुपवर भारतीय शेअर बाजारात कोणतेही ट्रेडिंग करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकेच्या या ट्रेडिंग ग्रुपमधील कंपन्या भारतीय शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु शकणार नाहीत. याबाबत सेबीने अंतरिम आदेश पारित केला आहे.
१०५ पानांच्या अंतरिम आदेशात सेबीने म्हटले आहे की, कथित बेकायदेशीररित्या कमावलेले ४,८४३ कोटी रुपये जप्त केले जातील आणि बँकांना जेन स्ट्रीटशी संबंधित खात्यांमधून परवानगीशिवाय पैसे काढण्यावर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. जेन स्ट्रीट ग्रुपच्या कंपन्यांनी भारतीय शेअर बाजारांत फेरफार करून ४,८४३ कोटी रुपये कमावले. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करुन मिळवलेले हे पैसे त्यांना हे पैसे एस्क्रो खात्यात जमा करावे लागतील, असे सेबीने अंतरिम आदेशात म्हटले आहे.
जेन स्ट्रीट ग्रुप ही एक ग्लोबल प्रॉपरायटरी ट्रेडिंग फर्म आहे. ही फर्म तिच्या उपकंपन्यांद्वारे जगातील ४५ हून अधिक देशांमध्ये ट्रेडिंग करते. अमेरिका, युरोप आणि आशियात त्यांची पाच ठिकाणी कार्यालये आहेत. यात २,६०० हून अधिक लोक काम करतात. हा ग्रुप शेअर बाजारात मोठा नफा कमवण्याच्या उद्देशाने अल्गोरिदम आधारित रणनीतीचा वापर करत होते.
तीन कंपन्यांद्वारे चालते कामकाज
भारतातील जेन स्ट्रीटचे कामकाज तीन नोंदणीकृत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांमार्फत चालते. त्यात जेन स्ट्रीट एशिया ट्रेडिंग लिमिटेड, जेन स्ट्रीट इंडिया ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जेन स्ट्रीट एशिया एलएलसी यांचा समावेश आहे.