लातूर : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर लातूर ‘मिशन पिंक हेल्थ’ या आरोग्यविषयक जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थीनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात , ‘मिशन पिंक हेल्थ’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वैशाली दाताळ, डॉ. राखी सारडा, डॉ. दीपिका भोसले यांची उपस्थिती होती. यांचे स्वागत मुख्याध्यापिका संगीता कासार यांनी केले. ‘किशोरवयीन विद्यार्थिनींचे मानसिक स्वास्थ्य व मोबाईलचे व्यसन’ या विषयावर अतिशय समर्पक व यथायोग्य मार्गदर्शन डॉ. वैशाली दाताळ यांनी केले.
आपल्या वक्तव्यात किशोरवयीन मुलींच्या मानसिक स्वास्थ्याची कारणे, लक्षणे व उपाय स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, सकारात्मक विचार करून अन्न,पाणी, पर्यावरणाच्या जतन, संवर्धनासाठी प्रयत्न करून आपले व्यक्तिमत्व विकसित करावे, हा मोलाचा संदेश दिला. ‘मासिक पाळी, स्वच्छता व लसीकरण’ या विषयावर डॉ. राखी सारडा यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्री प्रजनन संस्था, रचना व कार्य स्पष्ट केले. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावेळी होणा-या मनोकायिक बदलांची, भावनांची जाणीव करून दिली. विद्यार्थिनींनी या बदलांना सामोरे जाताना स्वच्छतेची काळजी घ्यावी असेही सांगितले.सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट याविषयी शास्त्रीय माहिती दिली. शेवटी डॉ. दीपिका भोसल यांनी अॅनिमिया व पोषकद्रव्ये याविषयी कृतीयुक्त मार्गदर्शन केले. रक्तक्षयाची कारणे, लक्षणे व उपाय स्पष्ट केले. जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स यांच्या सेवनाने लठ्ठपणा व इतर आजार याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष कुमुदिनी भार्गव यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था व अंतर्गत येणा-या गोदावरी शाळेचा इतिहास, परंपरा व योगदान याविषयी अतिथींना सांगितले. पाहूण्यांचे आभार शाळेच्या निरीक्षिका अचला देशमुख यांनी मानले. तर सूत्रसंचालन विज्ञान विभाग प्रमुख माया माने यांनी केले.