वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील बहुचर्चित प्रमुख कर आणि खर्च विधेयक असलेल्या ‘वन बिग ब्युटिफुल बिल’वर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. हे विधेयक अमेरिकेच्या संसदेत २१८ विरुद्ध २१४ मतांनी मंजूर झाले. २१८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने, तर २१४ खासदारांनी विरोधात मतदान केले. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.
अमेरिकेची जनता पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध, सुरक्षित आणि स्वाभिमानी होईल. ज्यांनी आम्हाला आमची वचने पूर्ण करण्यास मदत केली. एकजुटीने आपण ते सर्व काही करू शकतो, ज्याची कल्पना एक वर्षापूर्वीपर्यंत करणेही शक्य नव्हते. आपण काम करत राहू आणि जिंकत राहू, असे ट्रम्प म्हणाले.
‘वन बिग ब्युटिफुल बिल’ हे विधेयक मंजूर झाल्याने आता अमेरिकेतील मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा कमी होणार आहे. मोठ्या संख्येने स्थलांतरितांना देशाबाहेर काढणे (मास डिपोर्टेशन), लष्कर आणि सीमा सुरक्षेवरील खर्चात वाढ, तसेच पहिल्या कार्यकाळातील कर सवलती कायम ठेवणे यांसारख्या ट्रम्प यांच्या अनेक प्रमुख धोरणांना या कायद्यामुळे बळ मिळाले आहे. या कायद्यात टिप्स आणि ओव्हरटाईमवर कोणताही कर न लावण्याचा प्रस्ताव आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर
जनतेला भेट : ट्रम्प
शुक्रवारी अमेरिकेच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहात ‘वन बिग ब्युटिफुल बिल अॅक्ट’ मंजूर झाल्यानंतर आपल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, अमेरिकेसाठी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर यापेक्षा मोठी भेट असूच शकत नाही. या विधेयकामुळे, मी २०२४ मध्ये आयोवाच्या जनतेला दिलेले प्रत्येक मोठे आश्वासन पूर्ण झाले आहे. मी वचन दिल्याप्रमाणे, आम्ही ‘ट्रम्प टॅक्स कट्स’ कायमस्वरूपी लागू करत आहोत. आता टिप्स, ओव्हरटाईम किंवा सामाजिक सुरक्षेवर (सोशल सिक्युरिटी) कोणताही कर लागणार नाही.