अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतक-याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच त्यांचे पीककर्ज फेडण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी आज हाडोळती येथे पवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर असलेले कर्ज भरले. तसेच शासन सदैव शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी यावेळी मराठवाडा शिक्षण विभागाचे आमदार विक्रम काळे, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बागवे, सहाय्यक निबंधक पालवे, गटविकास अधिकारी पंकज शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख, निवृत्ती कांबळे, माधव पवार, शरद पवार, आशिक तोगरे, अशोक सोनकांबळे, विजय पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी अंबादास पवार यांच्याकडे हाडोळती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे थकीत कर्ज फेडण्यासाठी सहकार मंत्री पाटील यांनी सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडे सुमारे ४२५०० रुपये सुपूर्द केले. तसेच या रक्कमेचा भरणा करून बेबाकी प्रमाणपत्र पवार यांना सुपूर्द करण्यात आले आले आहे. राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतक-यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.