शुभमन द्विशतकानंतर शतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज
बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीतील पहिल्या डावात ऐतिहासिक द्विशतक ठोकले आणि असंख्य विक्रम मोडित काढले. त्यानंतर दुस-या डावातही शानदार शतक ठोकत इतिहास रचला. शुभमन एका कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा एकूण नववा आणि दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यासह त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
शुभमनने १२९ बॉलमध्ये ७७.५२ च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. १९७१ मध्ये सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक असा पराक्रम केला होता. त्यानंतर ५४ वर्षांनी शुभमनच्या रूपाने भारतीयाकडून असा विक्रम पाहायला मिळाला.
शुभमनच्या कसोटी कारकिर्दीतील हे आठवे शतक ठरले. त्याच्या शतकामुळे भारताने दुस-या डावात ४२७ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात १८० धावांची आघाडी आणि दुस-या डावातील ४२७ धावा अशा मिळून भारताच्या एकूण ६०७ धावा झाल्या. त्यामुळे इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावा काढाव्या लागणार आहेत. इंग्लंडच्या दुस-या डावाला सुरुवात झाली असून, त्यांचे ५८ धावांत ३ बळी गेले आहेत.
शुभमन जगातील
तिसरा फलंदाज
जगात एकाच कसोटीत २५० प्लस आणि १०० प्लस धावा करणारा शुभमन हा ग्रॅहम गूच व कुमार संगकारा यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.
इंग्लंडसमोर ६०८ धावांचे आव्हान
भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ४०७ धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात १८० धावांची आघाडी होती. या धावांचा पाठलाग करताना भारताने ६ गडी गमावून ४२७ धावा केल्या. यानंतर शुभमन गिलने डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान आहे.