राज-उद्धव ठाकरे एकत्र, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
मनसेसोबत युतीसाठी ठाकरेंचा पुढाकार
मुंबई : प्रतिनिधी
हिंदीसक्तीबाबत सरकारला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर आज झालेल्या विजय मेळाव्याच्या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असे सांगत पुढील काळात एकत्र राजकारण करण्याचे संकेत दिले. संकट आले की, मराठी म्हणून आपण एकवटतो आणि संकट गेले की एकमेकांशी भांडतो. पण आता असा नतदृष्टपणा करायचा नाही. तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. कुणावर अन्याय नको. पण अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका, असा इशारा त्यांनी दिला.
मराठी एकजुटीचा विजयी मेळावा वरळी डोम येथे आज पार पडला. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न लावता केवळ मराठीचा अजेंडा ठेवून झालेल्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, काँगे्रसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, रासपचे महादेव जानकर, सीपीएमचे प्रकाश रेड्डी, शेतकरी नेते अजित नवले, माकपचे विनोद निकोले, दीपक पवार, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आदी मान्यवरांबरोबरच शिवसेना-मनसेचे वरिष्ठ नेतेमंडळी आणि मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी मेळाव्यात केवळ उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेच व्यासपीठावर होते व या दोघांचीच भाषणे झाली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्यावर एकजूट दाखविणा-या सर्वांना धन्यवाद दिले. ब-याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली. आम्ही एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी असे ठणकावून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्रात आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा सरकारला दिला.
आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता, तो अनाजी पंतानी दूर केला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. आज सर्वांनी मराठी भाषेसाठी वज्रमूठ दाखवली. मधल्या काळात आम्ही दोघांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचे आणि फेकून द्यायचे, हे यांचे धोरण असते. पण आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आता तुमच्या ७ पिढ्या आल्या तरी हिंदीची सक्ती करू देणार नाही. तुम्ही कितीही समित्या लावा, हिंदीची सक्ती चालणार नाही म्हणजे नाही. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली. त्याचा मला अभिमान आहे. मागील विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केले. महाराष्ट्रात मराठ्यांना उचकवले आणि मराठेतरांना एकत्र करून सत्ता प्राप्त केली. मराठी माणूस आपसात भांडले आणि दिल्लीचे गुलाम आज आपल्यावर राज्य करायला लागल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
काल तो एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चरमधला हिरो झुकेगा नही साला असे म्हणतो. पण हे लोक उठेगा नही साला असे म्हणतात. अरे कसे उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखे. म्हणजे विचार मी म्हणतोय… हिंदी भाषेला विरोध न करणारा माणूस बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल. आपला मालक आला म्हणून त्याच्यापुढे जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांचा पाईक असू शकेल, असा टोला शहा सेनेच्या मिंधेंना उद्धव ठाकरे यांनी लगावला.