पुणे : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पाठ फिरवली आणि पुन्हा जगभरातील व्यवहार सुरळीत झाले आहेत. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोनाने जगाची धाकधूक वाढवली आहे. हिवाळा सुरू झाला असून हळूहळू वातावरणातील गारवा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता कोरोनानेही डोके वर काढले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली होती. राज्यात एकही कोरोना रुग्ण आढळत नव्हता. मात्र हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. राज्यात काल तीन रुग्ण आढळले. तर देशात १२२ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान गेल्या वर्षीही हिवाळा सुरू होताच अचानक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यंदा देखील डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
हिवाळ्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राज्यात आणि देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या अगदी शून्यावर आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरणातील उष्णता कमी होऊन वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. उष्णतेपासून सर्वांचीच सुटका झाली असून आल्हाददायी वातावरणामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, आता कोरोनाने पुन्हा एकदा टेन्शन वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.