नागपूर : राज्यातील शेतक-यांसाठी मोठी बातमी समोर येत असून, शुक्रवारी विधानसभेत शेतक-यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा होणार आहे. अवकाळी पावसासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी घोषणा करणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या घोषणेनंतर राज्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पाय-यांवर आंदोलन देखील केले होते. त्यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आता शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतक-यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधीच अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामासोबतच रबीचा हंगाम देखील शेतक-यांच्या हातून गेले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसानभरपाईची घोषणा केली जाणार आहे. मात्र, ही नुकसानभरपाई किती असणार आहे? या घोषणेचा शेतक-यांना किती फायदा होणार आहे?, याकडे राज्यभरातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल…
दरम्यान, याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. शेतक-यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. ‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतक-यांना मात्र सरकार मदत करत नाही. राज्यात बळिराजा प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते.