जयपूर : संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह जयपूर दौऱ्यावर आहेत. भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून ते जयपूरला आले आहेत. राजस्थानमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत नव्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. राजनाथ सिंह यांच्याशिवाय सरोज पांडे आणि विनोद तावडे हेही केंद्रीय निरीक्षक म्हणून जयपूरला पोहोचले आहेत. जयपूरला पोहोचल्यावर राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही नेत्यांचे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी स्वागत केले.
वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत आणि राज्यातील भाजपच्या सर्वात ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. परंतु भाजपने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्याही नेत्याला पुढे केले नव्हते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर वसुंधरा नवनिर्वाचित आमदारांच्या सतत संपर्कात असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची दावेदारी सुरू असल्याचा दावाही करण्यात आला.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही लोकांनी ‘सरप्राईजसाठी तयार’ असले पाहिजे, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार किरोरी लाल मीणा यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून अश्विनी वैष्णव, किरोडीलाल मीना, ओम माथूर, वसुंधरा राजे, गजेंद्र सिंह शेखावत आणि दिया कुमारी यांच्या नावाचीही चर्चा आहे. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने १९९ पैकी ११५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आहेत.