17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयअंजनी कुमार यांचे निलंबन रद्द

अंजनी कुमार यांचे निलंबन रद्द

हैदराबाद : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणे पोलिस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार यांना चांगलेच महागात पडले होते. त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता ए. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतर निवडणूक आयोगाने (ईसीआय) अंजनी कुमार यांचे निलंबन रद्द केले आहे. मतमोजणीच्या दिवशी अंजनी कुमार यांनी विद्यमान मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.

रेवंत रेड्डी यांची भेट घेतल्याने हा आचारसंहितेचा भंग मानून त्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले होते. जेंव्हा ते रेवंत रेड्डी यांना भेटले तेंव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री नव्हते तर ते तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. अंजनी कुमार यांच्या निलंबनानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक रवी गुप्ता यांची डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अंजनी कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आयोगाने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. आयोगाला दिलेल्या उत्तरात अंजनी कुमार यांनी सांगितले की, त्यांनी जाणूनबुजून आदर्श संहितेचे उल्लंघन केलेले नाही. आयपीएस अधिकाऱ्याने आयोगाला सांगितले की, रेवंत रेड्डी यांच्या विनंतीवरून ते त्यांच्या घरी गेले होते. भविष्यात या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्वासन त्यांनी आयोगाला दिले आहे. ईसीआयने ३ डिसेंबर रोजी मुख्य सचिवांना अंजनी कुमार यांना निलंबित करण्याचे आणि डीजीपीचा कार्यभार पुढील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते.

मोठे फेरबदल होण्याची शक्यता
अंजनी कुमार यांचे निलंबन संपल्यानंतर कुमार यांना डीजीपीपदी बहाल केले जाणार की रवी गुप्ता या पदावर कायम राहणार हे सध्या स्पष्ट झालेले नाही. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार याबाबत निर्णय घेईल. तेलंगणा सरकार येत्या काही दिवसांत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR